मुंबई, (प्रतिनिधी) : मोबाईल हा आता प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भागच बनला असून, मतदान केंद्रावर मोबाईल ठेवण्याची सुविधा नसल्याने अनेकांची अडचण होते. निवडणूक आयोगाने याची दखल घेत मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मतदारांना केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. सोबतच आता मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतराच्या आत प्रचारास मनाई करण्यात आली आहे. मोबाइल फोनचा ग्रामीण आणि शहरी भागातील वाढता वापर लक्षात घेता, तसेच वृद्ध, महिला आणि दिव्यांग मतदारांना येणार्या अडचणींचा विचार करता, आयोगाने केंद्राच्या बाहेरच मोबाईल ठेवण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत केवळ बंद अवस्थेतील मोबाइल्स नेण्यास परवानगी राहील. प्रवेशद्वाराजवळ सोप्या बॉक्स किंवा पोत्यांद्वारे ही सुविधा दिली जाणार असून, मतदारांना केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. मात्र, काही ठिकाणी परिस्थिती बिघडण्याची शक्यता असल्यास, निवडणूक निर्णय अधिकारी याला अपवाद देऊ शकतात.
Fans
Followers